मुंबईच्या हवेची ‘धूळ’धाण
गेल्या काही वर्षांत मुंबईत सुरू असलेली विविध विकासकामे आणि बांधकामे यांतून निर्माण होणारी धूळ हवेत पसरत असल्यामुळे शहराची हवा अधिकाधिक प्रदुषित होऊ लागली आहे. मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाने २०१८-१९ या वर्षांच्या पर्यावरण अहवालात हवेच्या प्रदूषणाची स्थिती मांडली असून त्यानुसार सर्वाधिक विकासकामे सुरू असलेल्या भागांत हवेतील धुलिकणांचे प्रमाण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) आखून दिलेल्या प्रमाणित पातळीच्या जवळपास दुप्पट असल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेने तयार केलेल्या पर्यावरण स्थितीदर्शक अहवालातील आकडेवारीनुसार हवा प्रदुषणात देवनार आणि अंधेरी परिसर आघाडीवर आहे. तर वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी, बोरिवली, माझगाव आदी परिसरांमध्ये धुलीकणांचे प्रमाण मानकाच्या तुलनेत कितीतरी जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. याखेरीज मुंबईतल्या हवेत नायट्रोजन डायऑक्साइड आणि अमोनिया या घातक वायूंचे प्रमाणही अधिक असल्याचे उघड होत आहे.
पालिकेच्या पर्यावरण विभागाने २०१८-१९चा पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल तयार केला आहे. मुंबईमधील प्रदुषणाच्या पातळीचे मोजमाप करण्यासाठी पालिकेने वरळी, अंधेरी, भांडूप आणि देवनार भागात वातावरणीय हवेची गुणवत्ता मोजणारी स्थिर संनियंत्रण केंद्र उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर वरळी वडाळा आणि अंधेरी येथील वाहतूक नाक्यांवर स्वयंचलित संयंत्रांद्वारे सर्वेक्षण करण्यात येते. हवेतील वायू सर्वेक्षण केंद्रांच्या साखळी अंतर्गत सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, अमोनिया आणि तरंगणारे धुलीकण या प्रदुषकांचेही सर्वेक्षण करण्यात येते. पर्यावरण विभागाने केलेल्या २०१८-१९ या वर्षांतील सर्वेक्षणानुसार हवेतील धुलिकणांचे प्रमाण ही सर्वात गंभीर समस्या असल्याचे आढळून येते. सीपीसीबीने आखून दिलेली धुलिकणांची प्रमाणित पातळी ६० मायक्रो ग्रॅम इतकी सुस आहे. परंतु, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी, बोरिवली, माझगाव या भागांत धुलिकणांचे प्रमाण जवळपास दुप्पट असल्याचे दिसून येते. चेंबूर, भांडूप, कुलाबा, मालाड आणि वरळी या भागांतही धुलिकणांची समस्या गंभीर असल्याचे अहवालातील आकडेवारीतून दिसून येते.
देवनार परिसरात नायट्रोजन डायऑक्साईड आणि अमोनियाचे प्रमाण केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मानकापेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. मंडळाच्या मानकानुसार नायट्रोजनचे हवेतील प्रमाण ४० मायक्रो ग्रॅम, तर अमोनियाचे प्रमाण १०० मायक्रो ग्रॅम असायला हवे. पण २०१८-१९ या वर्षांत देवनार परिसरात ते अनुक्रमे ५९ मायक्रो ग्रॅम आणि १२६ मायक्रो ग्रॅम असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. वरळी (५० मायक्रो ग्रॅम), अंधेरी (६९ मायक्रो ग्रॅम), भांडूप (५५ मायक्रो ग्रॅम) येथे नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण तुलनेत अधिकच आहे.