अनधिकृत तिकिट दलालांना बेड्या
सणासुदीच्या काळात रेल्वे आरक्षित तिकिटांची गरज लक्षात घेत प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या टोळीला रेल्वे सुरक्षा बलाने गजाआड केले आहे. मुंबईसह एकूण पाच ठिकाणी एकाच वेळी छापे टाकत रेल्वे सुरक्षा बलाने १० लाखांची रेल्वे तिकिटे जप्त केली. या कारवाईत २३ दलालांना अटक करण्यात आली. कारवाईत जप्त केलेली आरक्षित तिकिटे रद्द करण्यात येणार असल्याने प्रवाशांनी अनधिकृत तिकिट दलालांच्या आमिषाला बळी न पडता अधिकृत ठिकाणाहूनच तिकिट खरेदी करावे, असे रेल्वेने सांगितले आहे.
रेल्वेवरील अनधिकृत तिकिट दलालांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने 'ऑपरेशन थंडर' राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रथमच आरपीएफच्या सायबर सेलची मदत घेण्यात आली. अनधिकृत दलालांचा ठावठिकाणा समजल्यानंतर मुंबईसह, पुणे, नागपूर, सोलापूर आणि भुसावळ या ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आले. यात १० लाख रुपयांची ७४२ आरक्षित तिकिटे जप्त करण्यात आल्याचे आरपीएफचे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त अतुल पाठक यांनी सांगितले.
जप्त करण्यात आलेली तिकिटे रद्द करण्यात येणार आहेत. दरम्यान कारवाईत अटक केलेल्या २३ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. आगामी गणेशोत्सव काळात आरामदायी प्रवासासाठी आरक्षित तिकिटांना मोठी मागणी आहे. याचाच फायदा घेऊन अनधिकृत दलाल गरजू प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे उकळतात. 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत दर आठवड्याला ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलातील अधिकाऱ्यांनी दिली.
आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर बनावट आयडी कार्यान्वित करुन आरक्षित तिकिटे काढली जातात. या तिकिटांची विक्री करताना प्रवाशांकडून अधिक पैसे घेण्यात येतात. प्रवासी आरक्षण यंत्रणेत दर मिनिटाला देशभरातून २० हजारांहून अधिक तिकिटे बुक केली जातात. यामुळे बनावट आयडी ओळखण्याचे आव्हान कायम असल्याचे आरपीएफ सायबर कक्षाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.