ताजी बातमी

गोवा येथील कमी दर्जाची दारू, वेगवेगळ्या विदेशी कंपनींच्या दारुच्या बाटल्यांमध्ये भरून विकणाऱ्याला नवी मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने नुकतीच अटक केली. रंजन शेट्टी असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून तीन लाख ३० हजार रुपये किमती मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पनवेलच्या नागझरी गावात काही व्यक्ती गोवा येथून अवैधरीत्या कमी प्रतीची विदेशी दारू आणून ती वेगवेगळ्या विदेशी रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून महाराष्ट्र, गुजरात येथे विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती युनिटचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गज्जल यांना मिळाली होती. त्यानुसार मध्यवर्ती युनिटच्या पथकाने सोमवारी नागझरी गावातील काठे चाळीमधील दोन खोल्यांवर छापा मारला. यावेळी अवैधरीत्या आणलेली कमी प्रतीची विदेशी दारू विविध कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून बनावट झाकण सील लावण्यात येत असल्याचे आढळून आले.

रंजन शेट्टी ऊर्फ रंजनकुमार (४९) हा सदरची बनावट दारू आपल्या साथीदारांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विकत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक करुन त्याठिकाणी असलेल्या तीन लाख ३० हजार रुपये किमतीच्या रॉयल ब्लेंड व्हिस्कीच्या तीन हजार ३०० बाटल्या, विदेशी कंपन्यांच्या बटल्या सील करण्यासाठी वापरण्यात येणारी नऊ हजार ७०० बनावट झाकणे जप्त करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी शेट्टीविरोधात ठाण्यातील मानपाडा पोलिस ठाण्यात अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी. कोल्हटकर यांनी दिली.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट