दंडाच्या नावे लोकांकडून खंडणी गोळा करणाऱ्या क्लीनअप मार्शल्सला अटक
घाटकोपर पोलिसांनी मुंबईकरांकडून दंडाच्या नावे खंडणी गोळा करणार्या दोन क्लीनअप मार्शल्सना अटक केली आहे. कैलाश राय सुराडकर आणि इम्रान हुसैन अशी या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी घाटकोपर पश्चिमेला एका व्यक्तीला आपण बीएमसी मार्शल असल्याचं हटकलं होतं. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने ४०० रुपयांचा दंड भरण्याची मागणी आरोपी करत होते. अधिकृत दंड २०० रुपये आहे.
यावेळी तेथूनच जाणारे प्रशांत अंकुशराव यांनी हा सगळा प्रकार आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. त्यांनी दोघांनाही घाटकोपर पोलीस ठाण्यात नेलं तसंच महापालिकेकडेही तक्रार नोंद केली. महापालिका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “जेव्हा आम्ही पोलीस ठाण्यात पोहोचलो तेव्हा त्यांची ओळखपत्रं आता वैध राहिली नसल्याचं समोर आलं. तसंच सुट्टी असल्याने ते कर्तव्यावर नसणं अपेक्षित होतं. याशिवाय कारवाई करताना त्यांनी गणवेशही घातलेला नव्हता”.
“क्लीनअप मार्शलला दंड गोळा करताना काही नियम पाळणं अनिवार्य आहे. त्यांनी गणवेश घालणं, ओळखपत्र सोबत ठेवणे आणि दाखवणे, तसंच लोकांसोबत योग्य वर्तवणूक ठेवणे. या प्रकरणात मार्शल्सची वागणूक अस्विकार्य आहे”, असंही अधिकाऱ्याने म्हटलं आहे. “त्यांनी गणवेश घातला नव्हता आणि जास्त दंड आकारत होते”, असंही त्यांनी सांगितलं आहे.