‘चिंतामणी’ची एक झलक मिळण्यासाठी तरुणाईची अलोट गर्दी
मुंबई : चिंचपोकळी चिंतामणी मंडळाचे शतकोत्सवी वर्ष असल्याने रविवारी पार पडलेल्या आगमन सोहळ्यात राज्यातील विविध भागांतील गणेशभक्तांनी हजेरी लावली होती. बाप्पाची एक झलक मिळण्यासाठी उपस्थितांनी केलेली धडपड आणि अतिउत्साह हा उपद्रव करणारा ठरल्याचे चित्र दिसून आले. आगमन सोहळ्याच्या अंतिम टप्प्यात लालबाग परिसरात चपलांचा खच, दुभाजकांवरील झाडांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान आणि हुल्लडबाजी करणारी तरुणाई दिसून आली.
दुपारी सुरू झालेल्या या आगमन सोहळ्यासाठी रविवारी सकाळपासून गणेशभक्तांनी हजेरी लावली. या वेळी चिंतामणी मंडळाचे टी-शर्ट परिधान केलेले तरुण-तरुणींचे ग्रुप्स चिंचपोकळी, करी रोड स्थानकांवर मोठमोठ्या आवाजात किंचाळत- ओरडत मिरवणुकीच्या दिशेने जाताना दिसून आले. चिंचपोकळीचा पूल धोकादायक असल्याने तेथे गर्दी करू नये, असे आदेश देऊनही मोठ्या प्रमाणावर तरुणाई या पुलावरच ठाण मांडून बसलेली दिसून आली. पोलिसांनी पुढाकार घेऊन या गर्दीवर नियंत्रण मिळविले, दुर्घटनेचा धोका वेळीच टळल्याचे दिसून आले.
पालिकेने सुचविलेल्या पर्यायी मार्गाला नकार देत चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाने स्वत:च्या जबाबदारीवर आगमन सोहळ्याचे व्यवस्थापन केले होते. आगमन सोहळ्यादरम्यान केवळ दुभाजकांवर मंडळाचे कार्यकर्ते नजरेस पडले, ही संख्या हजारोंच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अत्यंत कमी असल्याचे दिसून आले. गर्दीचे व्यवस्थापन नसल्याने ठिकठिकाणी दुचाकी पार्क केलेल्या दिसून आल्या, बाप्पाची झलक दिसताच रेटारेटी करणाऱ्या तरुणाईमुळे अनेकांना मुका मार बसला. यात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलांना अधिक त्रास झाल्याचे दिसले. या आगमन सोहळ्यादरम्यान मंडळाच्या वतीने कुठलेही आपत्कालीन वैद्यकीय उपचार पथकाची सेवा कुठेही नसल्याचे दिसून आले.