माटुंग्यात रस्त्यात बसने अचानक घेतला पेट
मुंबईत बेस्ट बसने अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. माटुंगा येथील माहेश्वरी उद्यानाजवळ या बसने पेट घेतला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नसून सर्वजण सुरक्षित आहे. बसने पेट घेताच बसमधील प्रवाशांना तात्काळ खाली उतरवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
वरळी बस आगाराची २७ क्रमांकाची ही बस मुलुंडहून वरळीला जात होती. दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास बस माटुंगा येथील माहेश्वरी उद्यानाजवळ पोहोचली असताना चालकाला केबिनमधील इलेक्ट्रिक बोर्डातून धूर येत असल्याचं लक्षात आलं. यानंतर काही वेळातच आग लागली. चालकाने तात्काळ बस बाजूला घेतली आणि बसमधील प्रवाशांना खाली उतरवलं. बसचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. पण तोपर्यंत बस आगीत जळून खाक झाली होती.