६० ठिकाणी रेल्वेची पे अँड पार्कसाठी मंजुरी
रेल्वे स्थानकालगतच्या जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नवीन जागांसाठी पाहणी केली होती. त्यानुसार मध्य रेल्वेने एकूण ६० ठिकाणी पार्किंगसाठी परवानगी दिली. यानुसार ४७ ठिकाणी 'पे अँड पार्किंग'ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. उर्वरित १३ जागांवर पार्किंगसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच पार्किंगची जागा सर्वसामान्य वाहनचालकांसाठी खुली करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.
सध्या सुरू असलेल्या पार्किंगच्या जागांमध्ये सुमारे २५ हजार वाहने उभी राहत आहेत. २०१८मध्ये मध्य रेल्वेवर एकूण ३६ रेल्वे स्थानक परिसरातील जागेत पार्किंग सेवा सुरू करण्यात आली होती. येत्या महिन्याभरात यात आणखी वाढ होणार असल्याने रेल्वे प्रवाशांना पार्किंगप्रश्नी काही अंशी दिलासा मिळणार आहे. सन २०१८मध्ये पार्किंगमधून रेल्वेने ४.३६ कोटींची कमाई केली होती.