कोट्यवधींचा ड्रग्जसाठा हस्तगत
मुंबईत येणारा ड्रग्जचा साठा रोखण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकासह स्थानिक पोलिसांनी देखील कंबर कसली आहे. गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी वडाळा, खार आणि मालाड येथे केलेल्या कारवाईत सहा कोटींहून अधिक किंमतीचे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहे. आफ्रिकन नागरिकांसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
खार पश्चिमेकडील सरदार राजेंद्रसिंग आनंद चौकांमध्ये परदेशी नागरिक ड्रग्ज विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे वांद्रे युनिटचे पोलिस निरीक्षक अनिल वाढवणे, सहायक निरीक्षक विशाल खैरे, सुशांत बंडगर, उपनिरीक्षक शंकर पवळे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी सापळा लावला. संशयास्पद फिरणाऱ्या बोनाव्हेंचुर इनवुदे या दक्षिण आफ्रिकन नागरिकाला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये सहा कोटी १२ लाखाचे कोकेन सापडले. हे कोकेन त्याने परदेशातून आणल्याचे चौकशीतून उघड झाले असल्याने यामध्ये मोठी साखळी असल्याची शक्यता आहे.
वडाळा येथील हरियाली हॉटेलजवळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक गंगाधर सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक अश्विनी माने यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मुश्ताक अन्वर अली आणि मेहमूद उमर हुसेन जीवा या दोघांना अटक केली. या दोघांकडे नऊ लाखांचा सुमारे साडेचार किलो चरसचा साठा सापडला. तर बांगूरनगर पोलिसांनी एका तरुणाकडून दोन लाखांचे एमडी आणि चार लाखांच्या प्रतिबंधित गोळ्या हस्तगत केल्या. या गोळ्यांचा नशेसाठी गैरवापर केला जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.