ताजी बातमी

धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यासाठी जागतिक पातळीवरील निविदा प्रक्रियेत दुबईस्थित ‘सेकलिंक’ ही कंपनी सरस ठरलेली असतानाही या कंपनीला कंत्राट देण्याऐवजी फेरनिविदा काढण्याचे निश्चित झाल्याचे कळते. या प्रक्रियेत कायदेशीर अडथळा येऊ नये, यासाठी महाधिवक्त्यांचे मत घेण्यात आल्यानंतरच फेरनिविदेबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलाचा विस्तारित भाग समजल्या जाणाऱ्या सुमारे ५९३ एकरवर पसरलेल्या धारावी झोपडपट्टीचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी राज्य शासनाकडून २००४ पासून प्रयत्न सुरू आहेत. धारावीचे पाच भाग करून त्यापैकी एक भाग म्हाडाला विकसित करण्यासाठी देण्यात आला. उर्वरित चार भागांसाठी विद्यमान भाजप सरकारने २०१६ मध्ये जागतिक पातळीवर निविदा जारी केल्या. या निविदा प्रक्रियेत सुरुवातीला अनेक बडय़ा विकासकांनी रस दाखविला. परंतु कालांतराने एकाही विकासकाने प्रतिसाद न दिल्याने निविदा रद्द करावी लागली. शासनाने भरघोस सवलती देऊनही विकासकांनी त्यात रस घेतला नाही. त्यानंतर अलीकडे धारावीचा एकात्मिक पुनर्विकास करण्यासाठी राज्य शासनाने ‘विशेष हेतु कंपनी’ स्थापन करीत सवलतींची खैरात केली. जागतिक पातळीवर निविदा काढताना मूळ किंमत ३,१५० कोटी इतकी ठरविण्यात आली. या निविदेसाठी सेकलिंकने ७२०० कोटी तर अदानी रिएल्टीने ४५०० कोटींची निविदा भरली. त्यामुळे अर्थातच सेकलिंकची निविदा सरस ठरली. या प्रकल्पासाठी २८ हजार ५०० कोटींची गुंतवणूक करण्यास संयुक्त अरब अमिरातीतील राजघराणे तयार असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. मुख्य सचिवांच्या समितीनेही ‘सेकलिंक’ची निविदा सरस ठरवत तसा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला. याबाबत अधिकृत घोषणा मुख्यमंत्र्यांकडून केली जाणार होती. मात्र १० मार्चपर्यंत घोषणा होऊ शकली नाही. त्यानंतर आचारसंहिता लागू झाल्याने ही घोषणा आचारसंहितेनंतर केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र अद्याप घोषणा झालेली नाही. या प्रकल्पासाठी निविदा जारी केली तेव्हा रेल्वेचा ४५ एकर भूखंड त्यात अंतर्भूत नव्हता. याशिवाय परदेशातून जी गुंतवणूक येणार आहे त्याबाबतही पडताळणी करण्याची आवश्यकता असल्यामुळेच फेरनिविदेचा पर्याय काढण्यात आल्याचे या घडामोडींशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु कुठलाही कायदेशीर अडथळा नको, यासाठीच महाधिवक्त्यांचे मत घेण्यात आले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात