तिहेरी हत्याकांडांनी शिर्डी आणि नवी मुंबई हादरली
तिहेरी हत्याकांडाच्या दोन घटनांनी शिर्डी आणि नवी मुंबई ही दोन शहरं हादरली आहेत. दोन्ही ठिकाणी तिहेरी हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. शिर्डीमध्ये झालेल्या हत्याकांडातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर नवी मुंबईतील तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा पोलीस तपास सुरु आहे असे पोलिसांनी म्हटले आहे.
शिर्डीतील राहता निमगाव या ठिकाणी ठाकूर कुटुंबीयांमधील तिघांना अर्जुन पन्हाळे याने कोयत्याचे वार करून संपवले आहे. तर या घटनेत जखमी झालेल्या दोघांवर उपचार सुरू आहेत. या घटनेत सहा वर्षांची मुलगी बचावली आहे. दुसरीकडे नवी मुंबईतली वाशी स्टेशनजवळ विजय मलिक उर्फ दारासिंग या भंगार व्यावसायिकाशी निगडीत व्यक्तीची हत्या करुन त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर शनिवारी तुर्भे येथील गोडाऊन मध्ये भंगार व्यवसायाशी संबंधित तिघांचे मृतदेह आढळले आहेत. या तिघांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. नावेद, नौशाद आणि राजेश अशी हत्या झालेल्या तिघांची नावं आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.