राष्ट्रीय महामार्गालगत मद्य विक्री
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी व आच्छाड परिसरात महामार्गालगत खुलेआम ताडीची विक्री सुरू आहे. ताडीसोबत मद्याचीही सेवा दिली जात असल्याचे प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर अनेक अपघातांची शक्यता वाढली आहे. बेकायदा मद्यविक्रीकडे राज्य पोलीस, महामार्ग पोलीस तसेच या महामार्गाची देखभाल-दुरुस्ती पाहणाऱ्या आयआरबी या संस्थेकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. राष्ट्रीय महामार्गावर तलासरी पासून गुजरातच्या दिशेला आच्छाड व परिसरात रस्त्याकडेला ताडी विक्रीचे अनेक गुट्टे उभारण्यात आल्याचे दिसून येतात. चार लाकडी खांबांवर एखादा प्लास्टिक किंवा कापड बांधून त्याखाली बसण्यासाठी दगडाची किंवा लाकडाची आसन तयार केलेल्या या गुट्टय़ांमध्ये ड्रममध्ये साठवलेली ताडीची राजरोसपणे विक्री केली जाते. विशेष म्हणजे या ताडी विक्री केंद्रांना कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी नसून स्थानिक पोलीस व राज्यमार्ग पोलिसांच्या आशीर्वादाने हा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे दिसून येत आहे.
विनापरवाना ताडी विक्री केंद्रांवर प्रत्यक्ष ताडीची विक्री करण्यासाठी महिला कार्यरत असून या ठिकाणी बिअर व इतर मद्यपेय उपलब्ध करून देण्याची सुविधा करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. आच्छाडजवळ असलेल्या सावरोली, वरवाडा, आमगाव, काजळी या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये रस्त्याच्या दुतर्फा अशी अनेक ताडी विक्री केंद्र उभारण्यात आली असून या काही ठिकाणी ताडी गरम करण्यासाठीची सोय तसेच काही ठिकाणी चिकन भुजिंगदेखील उपलब्ध होताना दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गजवळ लगत असलेल्या उसाच्या रसाच्या काही दुकानांवरदेखील मद्यपेय मागणी केल्यास उपलब्ध होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या राष्ट्रीय महामार्गावर देखभाल-दुरुस्ती व रुंदीकरणाच्या काम करणाऱ्या आयआरबी या संस्थेची गस्ती पथके तसेच सुरक्षा अधिकारी या भागातून दिवसा किमान दोनदा चक्कर मारत असून त्यांच्या नजरेतून ही बाब कशी सुटली, असा सवाल उपस्थित होत आहे. आच्छाड-तलासरी या भागात ताडी वा इतर मद्य सेवन केल्यानंतर अनेक वाहनचालक त्याच्या गाडी चालवताना दिसून येतात. एकीकडे तलासरी आरटीओ तपसाणी नाक्याच्या जवळ वाहनांच्या परवाना आणि इतर कागदपत्रांची तपासणी करणाऱ्या पोलिसांच्या नजरेतून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहकांची तपासणी करण्याची कोणतीही सक्षम यंत्रणा नसल्याचे दिसून आले आहे.