वन क्षेत्रपाल कार्यालयातच डूक्कर मारण्यासाठी वापरणाऱ्या बॉम्बचा स्फोट
पौड ( पुणे) :मुळशी धरण परिसरात तसेच ताम्हिणी अभयारण्य परिसरात रान डुक्कर किंवा इतर प्राण्यांची शिकार कायम होत असते. मुळशी धरणभागातून ७० ते ८० ह्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी वापरण्यात येणारे छोटे बाँम्ब ताम्हिणी अभयारण्य वनक्षेञ विभागाने जप्त केले होते व ते पौड येथील कार्यालयात आणून ठेवले होते. आज (ता.५) ) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या सर्व बाँम्बचा एकाच वेळी स्फोट झाला.
या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की बाहेरील दोन्ही शटर वीस ते तीस फूट लांब जाऊन मुख्य रस्त्यावर पडले. तर शटरच्या आत लावलेली मोठी काच फुटून चाळीस फूट लांब जाऊन सर्वत्र विखरलेली होती. कार्यालयाच्या आत सर्व कपाटे विखरून पडलेली होती. दोन शटरच्या मधोमध असलेली भिंतसुध्दा पडून पंखा पूर्णपणे वाकडा झालेला होता. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलिस नाईक संदीप सकपाळ,संजय सुपे,ताम्हिणी अभयारण्याच्या वनक्षेञपाल अंकीता तरडे घटनास्थळी दाखल झालेले होते.