ताजी बातमी

भायखळा येथील वीर जिजामाता उद्यानातील प्राणीसंग्रहालयाचा कायापालट करण्यात येत असतानाच, मुंबई महापालिकेने आता गोरेगाव येथील आरे वसाहतीतही आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणीसंग्रहालय विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. आरे वसाहतीतराणीची बागवसवण्याचा प्रकल्प अनेक वर्षांपूर्वी आखण्यात आला होता. परंतु, मधल्या काळात बासनात गुंडाळला गेलेला हा प्रकल्प पालिकेचे नवीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पुनरूज्जीवित केला आहे. राज्य सरकारचा वन विभाग महापालिका यांच्या एकत्रित प्रयत्नाने सुरू होणाऱ्या या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या वनविभागाशी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. बुधवार, जून रोजी पर्यावरण दिनी हा करार करण्यात येणार आहे. पालिका मुख्यालयात सकाळी साडेअकरा वाजता शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे   अर्थ वने मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत हा करार होणार आहे.

राज्य सरकारच्या सहकार्याने पालिकेने आरे वसाहतीत प्राणीसंग्रहालय सुरू करण्याचा प्रकल्प आखला होता. मात्र जिजामाता उद्यान आरे वसाहतीत हलवण्याचा हा घाट असल्याचा कांगावा करीत काही राजकीय पक्षांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. जिजामाता उद्यानाची मोक्याची जागा विकण्याचे घाटत असल्याचाही आरोप त्या वेळी करण्यात आला. त्यामुळे आरे वसाहतीतील प्राणीसंग्रहालयाचा हा प्रकल्प मागेच राहिला. आता आयुक्तपदावर नव्याने आलेल्या प्रवीण परदेशी यांनी हा प्रकल्प पुन्हा मार्गी लावण्याचे ठरवले आहे. त्याकरिता त्यांनी हा जुना प्रस्ताव पुनरुज्जीवित केला आहे. आरे वसाहतीत प्राणीसंग्रहालय विकसित करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि पालिका यांच्यात सामंजस्य करार करण्यासाठीचा मसुदा राज्य सरकारकडे सन २०१४ मध्ये पाठवण्यात आला आहे. मात्र तो अद्याप मंजुरीसाठी प्रलंबित आहे. त्यामुळे हा करार करून पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता पालिका प्रशासनाने स्थायी समितीची मंजुरी मागितली आहे. आरे वसाहतीतील प्रस्तावित प्राणीसंग्रहालय हे जिजामाता उद्यानाचा विस्तारित भाग असल्याचेही प्रशासनाने या प्रस्तावात स्पष्ट केले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात