‘ई-सिगारेट धोकादायकच’
ई-सिगारेटचा वापर चिंताजनक स्वरूपात वाढत असल्याचे समोर येत आहे. सिगारेटसाठी पर्याय म्हणून वापराल्या जाणाऱ्या ई-सिगारेट्सचा वापर हा आरोग्यासाठी घातकच आहे. त्यामुळे तोंड, घसा, फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढते आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य तंबाखूमुक्त करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केले.
जागतिक आरोग्य संघटना, आरोग्य विभाग, सलाम फाऊंडेशनच्या वतीने जागतिक तंबाखूविरोधी दिन राज्यस्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. यानिमित्त नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सलाम फाऊंडेशनच्या अहवालानुसार, ई-सिगारेटचा वापर वाढत असून मुंबईतील ३०६पैकी ३३ टक्के रुग्ण या सिगारेटच्या व्यसनात अडकल्याचे समोर आले आहे. फाऊंडेशनच्या वतीने या कार्यक्रमात ई-सिगारेटवर बंदीची मागणीही करण्यात आली.