म्हाडाच्या २१७ घरांची उद्या सोडत; म्हाडा भवनमध्ये सोडत होणार
घरांचे स्वप्न उराशी बाळगत म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरणाऱ्यांचे डोळे आता रविवार, २ जूनच्या सोडतीकडे लागले आहेत. २१७ घरांसाठी जाहीर झालेल्या या सोडतीसाठी म्हाडा प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात ही सोडत निघणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने २१७ घरांसाठी जाहीर केलेल्या सोडतीस प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. या घरांसाठी ६६,०९१ जणांनी अर्ज दाखल केले आहे. या सोडतीसाठी प्रचंड सभामंडप उभारण्यात येत असून त्याची आसनक्षमता १,२०० इतकी आहे. अर्जदारांना मुख्यालयात येण्याची तोशीस पडू नये यासाठी म्हाडाच्या वेबसाइटप्रमाणेच फेसबुकवरूनही सोडतीचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. ही सोडत पारदर्शक असण्याच्या दृष्टीने म्हाडाने उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे.
सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी ५३,४५५ आणि मध्यम उत्पन्न गटासाठी १२,६३६ अर्ज दाखल झाले आहेत. या दोन्ही गटांत अनुक्रमे सुमारे १०६ कोटी आणि ३७ कोटी इतकी अनामत रक्कम जमा झाली आहे. सोडतीत घर न लागणाऱ्या अर्जदारांची लगोलग अनामत रक्कम परत करण्यात येते.
सोडत सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. या सभामंडपात तीन मोठ्या स्क्रीनदेखील ठेवण्यात येतील. या कार्यक्रमास गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, पालकमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, सभापती मधू चव्हाण यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील.