कन्यादानानंतर शेतकरी पित्याची आत्महत्या
मुलीचे कन्यादान केल्यानंतर कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली. बंडू उद्धवराव कांबळे (वय ५५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
नेर तालुक्यातील पांढरी (शिरजगाव) येथे राहणारे बंडू कांबळे आपल्या दोन भावांसह वडिलोपार्जित आठ एकर जागेवर शेती करत होते. त्यांच्यावर शेतीसाठी घेतलेले मोठे कर्ज होते. सततच्या नापिकीमुळे कर्जाचा हा डोंगर वाढत गेला. उसनवारी करून त्यांनी मुलीचे लग्न करून दिले. रविवारी त्यांच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडला. मंगळवारी सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर त्यांनी नववधू मुलगी व जावयास निरोप दिला. घरात पाहुणे मंडळी झोपली असताना रात्रीच्या वेळी घरातीलच एका खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. त्यांना आणखी एक मुलगी व मुलगा आहे.