मुंबईतील ५० टक्के शाळांमध्ये डबेवाल्यांना ‘नो एंट्री’
मुंबईतील विशेषत: दक्षिण मुंबईतील ५० टक्के शाळांनी डबेवाल्यांना विद्यार्थ्यांसाठी शाळेत डबे आणून देण्यापासून रोखले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे शाळा प्रशासनांचे म्हणणे असले तरी पालकांमध्ये या निर्णयावरुन नाराजी दिसून येते. मात्र, याबाबत पालकांनी उघडपणे भाष्य करण्यास नकार दिला आहे.
नुतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर या संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ मेडगे यांनी सांगितले की, शहरातील ५० टक्के शाळांनी मुख्यत: कॉन्व्हेंट शाळांनी डबेवाल्यांना प्रवेशबंदी केली आहे. पूर्वी आम्ही १ लाख डबे पुरवायचो. पण आता हा आकडा २० हजारांवर घसरला आहे.
मुंबई डबेवाला संघटनेचे सुभाष तळेकर यांनी प्रसिद्धीपत्रक काढून शाळांच्या या कृतीचा निषेध केला आहे. ‘एकीकडे शाळांमध्ये जंक फूडवर बंदी टाकली जाते आणि दुसरीकडे शाळा प्रशासन विद्यार्थ्यांना घरात तयार केलेले आरोग्यदायी खाद्यपदार्थ खाण्यापासून रोखत आहे. शाळा प्रशासन विद्यार्थ्यांना शाळेतील कँटिनमधून खाद्यपदार्थ विकत घेण्यास भाग पाडत आहे. यापूर्वी शाळांनी गणवेश, पुस्तकं याबाबतही असाच प्रकार केला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.