‘अंडरवर्ल्ड’वर पुन्हा करडी नजर?
संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील गुन्हेगार खास करून १९८०च्या दशकापासून अभिलेखावर संघटित टोळीचा सदस्य म्हणून नोंद असलेल्या प्रत्येकाची मुंबई गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली आहे. एके काळी संघटित गुन्ह्य़ात आघाडीवर असलेल्यांचे नवे ‘धंदे’ शोधून काढण्याच्या उद्देशाने प्रत्येक व्यक्तीबाबतचे सर्व तपशील नोंद होत असून ते टप्प्याटप्प्याने पडताळले जाणार आहेत.
पोलीस आयुक्त संजय बर्वे, तत्कालीन सहआयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या विविध कक्षांनी आपापल्या हद्दीतील संघटित टोळ्यांशी संबंधित गुंडांची यादी तयार केली. संघटित टोळ्यांना चाप लावण्यासाठी १९९९ मध्ये महाराष्ट्र शासनाने संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) आणला. या कायद्यानुसार अटक केलेल्या सर्वच गुंडांचा यादीत समावेश आहे. त्यापूर्वीच्या काळात टोळ्यांशी संबंधित गुंडांची नावे दाखल गुन्हय़ांच्या नोंदींवरून यादीत जोडली जात आहेत.
गुन्हे शाखेच्या १२ कक्षांसह खंडणीविरोधी पथकाकडे यादीनुसार गुंडांची चौकशी सुरू आहे. किती गुन्हे दाखल आहेत, खटले सुरू आहेत का, जामिनावर बाहेर आल्यानंतर उदरनिर्वाहासाठीचा व्यवसाय किंवा धंदा, निवासाचा पत्ता, संपर्क क्रमांक, मोक्काव्यतिरिक्त अन्य गुन्हे दाखल आहेत का? कोणत्या राजकीय पक्षाचा आश्रय आहे का? ही माहिती या चौकशीतून नोंद केली जात आहे. यादीतील दक्षिण मुंबईतील किंवा महत्त्वाच्या गुन्हय़ांमध्ये सहभागी गुंडांची चौकशी खंडणीविरोधी पथकाकडून सुरू आहे.