ट्रान्सहार्बरवर सर्वांत मोठा पिलर पूर्ण
मुंबई, नवी मुंबईसह रायगडपासून थेट दक्षिण भारतात जाण्यासाठी सोयीचा ठरणारा शिवडी न्हावा शेवा ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्प वेगात सुरू असून या प्रकल्पातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आठ मीटरचा पिलर टाकण्यात आला आहे. तर उर्वरीत पिलर टाकण्यासाठी ११ ठिकाणी खोदकामे करण्यात आली आहेत.
दीर्घकाळ रेंगाळलेल्या या प्रकल्पाने मागील काही महिन्यात चांगलाच मोठा पल्ला गाठला आहे. यंत्रसामग्री समुद्रस्थळी नेण्यासाठी शिवडीच्या बाजूने जेट्टीही बांधण्यात आली आहे. २२ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पातील १६.५ कि.मी.चा मार्ग समुद्रातून जात आहे, तर ५.५ कि.मी.चा मार्ग हा जमिनीवर आहे. मोठ्या प्रमाणावर समुद्रातून जाणारा देशातील बहुधा हा पहिला प्रकल्प असावा. यासाठी भर समुद्रात खोलवर पिलर टाकले जात आहेत. या प्रकल्पाच्या आसपास विविध तेल कंपन्यांच्या रिफायनरी आहेत. समुद्राखालून तेल किंवा इंधनाच्या वाहिन्या जातात. या वाहिन्यांना धक्का न पोहोचता पिलरचे काम काम काळजीपूर्वक केले जात आहे. मध्यंतरी या वाहिन्या समुद्रतळाला नेमक्या कोणत्या ठिकाणी आहेत याचा डायव्हर्सच्या माध्यमातून शोध घेतला जात होता. त्यानंतर या वाहिन्या नेमक्या कोणत्या जागेवर आहेत, समुद्राच्या तळांशी पाण्याचा वेग किती आहे, या वेगामुळे वाहिन्या किती अंतरापर्यंत हलत असतात, याची निश्चिती केल्यानंतरच पिलर टाकण्यासाठी खोदकाम करण्यास सुरुवात झाली आहे.
आतापर्यंत ११४ ठिकाणी खोदकामे करण्यात आली आहेत. तीन ठिकाणची खोदकामे पूर्ण झाली असून त्या ठिकाणी पिलर उभारण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी शिवडीच्या दिशेने आठ मीटर उंचीचा पिलर उभारण्यात आला आहे.