‘बँक ऑफ बडोदा’च्या ८०० ते ९०० शाखा होणार बंद?
सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या बँक ऑफ बडोदाकडून देशातील ८०० ते ९०० शाखा बंद करण्याचा किंवा अन्य शाखांमध्ये सामावून घेण्याचा विचार सुरू आहे. कार्यक्षमता वाढवण्याच्या हेतूने बँक ऑफ बडोदाकडून याबाबत विचार सुरू आहे. देना आणि विजया बँक या दोन्ही बँकांचं एक एप्रिल रोजी बँक ऑफ बडोदात विलीनीकरण करण्यात आले होते. देना आणि विजया बँकेच्या विलीनीकरणापासून याबाबत विचार सुरू आहे. आता या तीन बँकांची कार्यक्षमता वाढवण्याच्या हेतूने काहीच दिवसात तब्बल 800 ते 900 शाखांना टाळं लागण्याची किंवा इतर शाखांमध्ये विलीन करण्याची तयारी सुरु आहे.
एप्रिल महिन्यापासूनच बँकेच्या शाखांचा आढावा घेण्यात येत आहे. त्यानुसार काही शाखांचे अन्यत्र स्थलांतर किंवा काही शाखा कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत. देना आणि विजया बँकेच्या विलीनीकरणानंतर एकाच ठिकाणी दोन्ही बँकांच्या शाखा चालविण्यात येत होत्या. अनेक ठिकाणी तर तिन्ही बँकांच्या शाखा एकाच इमारतीमध्ये चालत असल्याचे आढळून आले. तिन्ही बँकांची प्रादेशिक आणि क्षेत्रीय कार्यालयेही एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या अतिरिक्त शाखा बंद करण्याचा किंवा अन्य शाखांमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती बँक ऑफ बडोदाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.