१ जूनला म्हाडा दुकानांची सोडत
म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळातील तब्बल ९ वर्षे रखडलेल्या २७४ दुकानांची सोडत अखेरीस १ जूनरोजी खुली होणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २७ मे आहे. या दुकानांसाठीची ई-टेंडर जाहिरात ३० मार्च रोजी प्रसिद्ध झाली आहे. या सोडतीत २९ मे ते ३१ मे दुपारी २ वाजेपर्यंत ऑनलाइन बोली खुली आहे.
म्हाडाकडून उपलब्ध केल्या जाणाऱ्या दुकानांसाठी स्वतंत्रपणे सोडत जाहीर होते. त्यातील जाहिरातीनुसार नोंदणी, ऑनलाइन अर्ज दाखल करणे, कागदपत्रे डाउनलोड करण्यासारख्या तांत्रिक गोष्टींसाठी २७ मे पर्यंतची अंतिम मुदत आहे. म्हाडाने यापूर्वी २०१० मध्ये १६८ दुकानांसाठी विक्रीची जाहिरात दिली होती. त्यानंतर नव्याने दुकानांसाठी सोडत निघण्यासाठी ९ वर्षाचा कालावधी लागला. या सोडतीत जादा बोलीनुसार दुकानांचा ताबा देण्यात येणार आहे.