नाशिकच्या डॉक्टरची ‘माउंट केनिया’वर चढाई
दक्षिण अफ्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे आणि केनियातील सर्वात उंच शिखर असलेले ‘माऊंट केनिया’ सर करण्याची किमया नाशिकच्या डॉ. शिरीष घन यांनी केली आहे. तब्बल १६ हजार ५०० फूट असलेल्या या शिखरावर चढाई करणारे घन हे नाशकातील पहिलेच गिर्यारोहक आहेत.
व्यवसायाने कान नाक, घसा तज्ज्ञ असलेल्या डॉ. घन यांनी आतापर्यंत अनेक अवघड चढाया केल्या आहेत. माउंट केनिया या शिखरावर चढाई करण्यासाठी एकूण चार जणांचा संघ सहभागी झाला होता. त्यात महाराष्ट्रातून घन हे एकमेव गिर्यारोहक सहभागी झाले होते. यातील तीन गिर्यारोहक हे भारतीय वंशाचे असून ते केनियाचे रहिवासी आहेत. माउंट केनिया हे शिखर आफ्रिका खंडातील दोन नंबरचे उंच शिखर आहे. दाट जंगलात व हिंस्त्र श्वापद असलेले हे ठिकाण चढाई करण्यासाठी शरिराचा कस लागतो. चार जणांच्या संघाने दि. १६ एप्रिल रोजी या शिखरावर चढाई करण्यास सुरुवात केली.
केनियातील सिरीमॉन या ८ हजार ५०० फुटावर असलेल्या नॅशनल पार्कच्या गेट पासून मोहिमेला सुरुवात झाली. ही मोहीम चार दिवसांची होती. पहिल्या दिवशी त्यांचा मुक्काम ११ हजार फुटावर असलेल्या ओल्ड मोझेस या ठिकाणी होता. या ठिकाणी मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मॅकेन्डर व्हॅली ओलांडून १४ हजार फूट उंचीवर असलेल्या शिफ्टन येथे जाण्यासाठी चढाई केली. या ठिकाणी जाताना पक्षांची, झाडांची जैव विविधता त्यांना अभ्यासता आली. तेथील सरकार वन्य जीवांचे रक्षण कशा पद्धतीने करते, याचा अभ्यास करता आला. या प्रवासात त्यांना माऊंटन हायरॅक्स (मोठे उंदीर) पाहता आले.