माणुसकी मेली! अपघातानंतर तो मदत मागत होता, तडफडत होता अखेर अंत
माणसांमधील माणुसकी संपत चालली की काय असा एक प्रश्न औरंगाबादेतील एका घटनेनं पुन्हा समोर आला. अपघातानंतर तब्बल तासभर जखमी मदतीसाठी विनवणी करत होता, मात्र लोकांची गर्दी फक्त फोटो काढण्यात आणि व्हिडीओ करण्यातचं दंग होती, मदत उशीरा मिळाली आणि त्या मुलाचा अंत झाला.. माणुसकली काळीमा फासणारी ही घटना औरंगाबादेत ३० एप्रिलला घडली आणि नंतर व्हिडीओ व्हायरल झाल्यानं सत्यता समोर आली.
ही अपघाताची दृश्यं आहेत औरंगाबादच्या सुमीत कवडेची. सुमीत ३० एप्रिलला मित्रांसोबत दौलताबादच्या हॉटेलमधून जेवून औरंगाबादकडे येत होता. यावेळी त्याच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. सुमीत आणि त्याचा मित्र रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. यावेळी रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली. यावेळी गर्दीतल्या लोकांनी त्यांची मदत करणे अपेक्षित होते. गर्दीतून मदतीचे हात येण्याऐवजी. गर्दीतल्या हातांमध्ये मोबाईल दिसले. गर्दीतल्या बघ्यांनी व्हिडिओ शूटिंग केलं. पण त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यासाठी कोणीही पुढं आला नाही. वैद्यकीय मदत मिळण्यात उशीर झाल्याने दुर्दैवाने सुमीतचा मृत्यू झाला, अशी माहिती सुमीतची आई सुनीता यांनी सांगितले.